नाफेड सोयाबीन खरेदी नियमात तातडीने शिथिलता आणावी,पातूर तालुक्यातील शेतकरी पुत्र आशिष पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची मागणी

अकोला/online24taas team
नाफेड मार्फत सुरू असलेल्या सोयाबीन खरेदीमध्ये लागू असलेले कठोर नियम तातडीने शिथिल करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शेतकरी पुत्र आशिष पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शासन व नाफेडकडे केली असून याबाबतचे निवेदन नायब तहसिलदार अजय टेलगोटे यांना देण्यात आले.

चालू खरीप हंगामात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे सोयाबीन पिकाच्या गुणवत्तेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. मात्र नाफेडकडून सोयाबीन खरेदीसाठी सध्या 12 टक्के आर्द्रतेची अट लागू असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा माल नाकारला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने कमी दरात खासगी व्यापाऱ्यांना माल विकावा लागत असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

नाफेडने आर्द्रता मर्यादा वाढवावी
यावेळी बोलताना शेतकरी पुत्र आशिष पाटील यांनी सांगितले की, “अवकाळी पावसामुळे सोयाबीनची गुणवत्ता नैसर्गिकरित्या घसरली आहे. अशा परिस्थितीत नाफेडने आर्द्रता मर्यादा किमान 14 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढवावी तसेच डागाळलेले व तुटलेले दाणे याबाबत हंगामापुरती सवलत द्यावी.”

तसेच खरेदी केंद्रांवर नमुना तपासणीमध्ये एकसमानता नसून काही ठिकाणी मनमानी पद्धतीने माल नाकारला जात असल्याच्या तक्रारीही शेतकऱ्यांनी केल्या. त्यामुळे तपासणी प्रक्रिया पारदर्शक ठेवावी, नोंदणी व खरेदी कालावधी वाढवावा आणि शक्य असल्यास वाळवण व ग्रेडिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी विवेक पाटील, उज्ज्वल सिरसाट, सचिन हिवराळे, अमर हिवराळे, विशाल पाटील,राजेंद्र सोळंके आदी शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *