जयसिंगपूर/प्रतिनिधी
शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील ऑटोमेशन व रोबोटिक्स अभियांत्रिकी विभागातील सहाय्यक प्राध्यापक पराग माणगांवे यांना बिट्स पिलानी,के के कॅम्पस येथे यांत्रिक अभियांत्रिकी विषयात पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आली.

माणगांवे यांनी “एक्सप्रिमेंटल इन्व्हेस्टिगेशन ऑन द इफेक्ट ऑफ बायोफ्युएल गॅसो-लाईन ब्लेंड्स इन स्पार्क इग्निशन इंजिनस” या विषयावर संशोधन पूर्ण केले. त्यांच्या प्रबंधाची परीक्षा २ एप्रिल २०२६ रोजी पार पडली. या संशोधनात स्पार्क इग्निशन इंजिनमध्ये जैवइंधन-गॅसोलीन मिश्रणांचा कार्यक्षमता व उत्सर्जनावर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला आहे.
या संशोधनासाठी त्यांना प्रा. डॉ. निलेश डी. पवार यांचे मार्गदर्शन तसेच सह-मार्गदर्शक प्रा. डॉ. रणजित एस. पाटील यांचे सहकार्य लाभले.
माणगांवे यांनी आयआयटी रूरकी,आयआयटी बॉम्बे,तसेच निरमा युनिव्हर्सिटी येथे आयोजित विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदवला असून अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स यांच्या नामांकित जर्नल्ससह इतर प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये संशोधन निबंध प्रकाशित केले आहेत.त्यांनी या यशाबद्दल अनिल अ. बागणे व डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे संस्थात्मक सहकार्याबद्दल आभार मानले.त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.