‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर e-KYC ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल. पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्वप्रथम लाभार्थ्यांनी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
मुखपृष्ठावर (Homepage)
दिसणाऱ्या ई-केवायसी (E-KYC) बॅनरवर क्लिक करा.तुमच्यासमोर केवायसी फॉर्म उघडेल.
यामध्ये लाभार्थ्यांनी त्यांचा आधार क्रमांक आणि पडताळणी कोड (म्हणजेच कॅप्चा) नमूद करा.
आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून ‘ओटीपी’ या बटणावर क्लिक करा.
ओटीपी आल्यानंतर, तुमची केवायसी आधीच पूर्ण झाली आहे की नाही, हे तपासले जाईल.
जर पूर्ण झाली असेल: तुम्हाला “ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश प्राप्त होईल.
जर पूर्ण झाली नसेल: तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे का नाही ते तपासला जाईल.
जर यादीत नसेल: “आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र यादीत नाही” असा संदेश येईल.
जर यादीत असेल: तर पुढील पायरीवर जा.
लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
त्यानंतर, ई-केवायसी मध्ये पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करा आणि कॅप्चा (पडताळणी कोड) भरा.
‘सेंड ओटीपी’ बटणावर क्लिक करा.पती/वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटण क्लिक करा.
अशाप्रकारे आपण लाडकी बहीण योजनेची केवायसी करू शकता..