
आपली लोकं कोण?हे बघणं ; आणि ती आपली आहेत म्हणून जगणं याला आयुष्य म्हणतात का? सध्या आपण बघतो की,जीवनात जगताना काही लोकं,वरवर आपली गरज असल्याचा भास निर्माण करतात, मात्र काही काळानंतर लक्षात येते की, त्या व्यक्तीच्या मनात आपली काय जागा आहे. मग आपण विचार करतो की आपल्या बाबतीत असं का घडतं?त्यावेळी डगमगायचं नाही.
माणसं दोन प्रकारची असतात. एक म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी अशी काही लोकांची इच्छा असते(स्वार्थी). तर काही लोकं दुसऱ्याच्या सुखासाठी परिणामी स्वतःचे दुःख लपवून आनंदाने जगत असतात(निस्वार्थी).ना कोणती अपेक्षा, ना कोणती इच्छा,नको असतो मानसन्मान. फक्त एकच असते ती निस्वार्थ भावनेने जगण्याची कला.मात्र यात दुसऱ्या प्रकारचे लोक असतात, ते नेहमीच काहीना काही कारणाने दुखावले जातात.पण काही वेळाने पुन्हा ते आपल्या मूळ रुपात येतात.अन घडलेल्या घटनांचा विसर पाडून पुन्हा नव्याने मार्गक्रमण करतात.
आता प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असते,अंत असतो.आयुष्यात एखाद्याचे आर्थिक नुकसान केले तर तो तेवढ्यापुरता राग मनात असतो. मात्र एखाद्याच्या मनाला लागेल किंवा मानसिक अर्थाने त्रास दिल्यास ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या मनातून उतरते.मग ती कितीही जवळ असो.बस मध्ये कधीही चढता येते , स्टॉप आल्यावर उतरता येते.मात्र एकदा एखादया माणसाच्या मनातून तुम्ही उतरल्या नंतर ,परत मनात जागा निर्माण करण्यासाठी खूप वेळ लागतो .
कधी-कधी आपण त्याच्या मनात जाऊ की नाही हाही प्रश्न निर्माण होतो. आणि अशा अनेक कारणाने मनापासून जपलेली नाती क्षणार्धात तुटली जातात, याचे एकमेव कारण असेल ते म्हणजे घमेंड.पाण्यात पडलेलं लाकूड बुडत नाही; पण लोखंड पडलं तर बुडतं याचं कारण वजन . अहंकारही याच वजनासारखा असतो .जो नेहमीच आपल्याला बुडवतो.
मानवाच्या अंगी काम,क्रोध,मद, मत्सर,मोह माया असे गुण लपलेले असतात.त्यांचा ज्यावेळी मानवावर अधिक प्रभाव वाढू लागतो,त्यावेळी जीवन जगणं कठीण होतं. कारण BALANCING IS MOST IMPORTANT THING IN MACHINE AND ALSO LIFE .माणसांमध्ये मत्सर निर्माण झाला की निर्माण होते ती घमेंड. समोरच्या व्यक्तीचा अपमान करणे, पाणउतारा करणे अशा घटना घडू लागतात. पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा ठरलेली असते.प्रत्येकाला मर्यादा असतात. मात्र अनेक लोक स्वभाव सोडायला तयार नसतात. कारण नात्यापेक्षा त्यांना घमेंड महत्वाची असते. मात्र प्रत्येक गोष्टीला काहीतरी अंत हा ठरलेला असतोच.विनाशकाले विपरीत बुद्धि अशीच परिस्थिती अशा लोकांची होते.
आयुष्यात सर्व काही करा; पण घमेंड करू नका.कारण अहंकारामुळे रावणाचे राज्य गेलं, दुर्योधनाला लाखोंचं सैन्य असून युद्धभूमीवर हार पत्करावी लागली. एवढा सर्व इतिहास डोळ्यासमोर असूनही माणूस अहंकाराच्या गर्तेत आकंठ बुडालेला दिसतो .दुर्योधनालाही अशीच घमेंड झाली होती. सुईच्या टोकावर मावेल एवढी जागाही पांडवांना आपण देणार नाही, अशामुळेच दुर्योधनाचा अंत झाला. महाभारत हेच शिकवते, माणूस कितीही मोठा असो मात्र अहंकार आला की त्याचा अंत नक्की ठरलेला आहे.
त्यामुळे तुम्ही किती सुंदर आहात, दिसता कसे, शरीरयष्टी कशी आहे? यावरून माणसाची किंमत ठरत नाही; तर त्या माणसांमध्ये नम्रता किती आहे, शील किती आहे, करूणा किती आहे, दुसऱ्या प्रति आदर किती आहे, या गुणांवरच माणसाच्या गुणवत्तेची पारख केली जाते. त्यामुळे घमेंड सोडा तरच आयुष्य सुखी होईल.