कबनूर – प्रतिनिधी
संयुक्त दत्तनगर कबनूर मधील मुलांनी अत्यंत सुंदर पद्धतीचे किल्ले बनवले असून,युवावर्गाला गड किल्यांची माहिती व्हावी यासाठी चलो रांगणा मोहीम राबविण्यात येणार असून,त्याचा सर्व खर्च संजय तेलनाडे फाऊंडेशन उचलेल असे प्रतिपादन इचलकरंजी नगरपालिका माजी सभापती संजय तेलनाडे यांनी केले.ते संयुक्त दत्त नगर आयोजित किल्ला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी संतोष हत्तीकर,दत्ता पाटील,प्रमोद सोडगे,भूषण माने,संतोष कांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र किल्ले बांधले जातात.पण युवा वर्गात किल्याविषयी अधिक जागरूकता यावी तसेच गड किल्ल्यांची माहिती व्हावी म्हणून कबनूर मधील संयुक्त दत्तनगर यांच्या वतीने भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी हे दुसरे वर्ष होते.यामध्ये सुमारे 26 संघांनी सहभाग घेतला.स्वागत प्रास्ताविक कृष्णात मगर यांनी केले.

यामध्ये प्रथम क्रमांक कट्ट्यावरची पोरं(किल्ला श्री मुरुड जंजिरा),द्वितीय क्रमांक मोरया ग्रुप (किल्ला विजयदुर्ग),तृतीय क्रमांक अथर्व आणि प्रतीक (किल्ला सिंधुदुर्ग) यांचा समावेश आहे.विजेत्यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र व सर्व सहभागी स्पर्धकांना संजय तेलनाडे फाऊंडेशन कडून वह्या देण्यात आल्या.यावेळी मुलांनी पोवाडा सादरीकरण केले.

यावेळी संतोष कांदेकर,शिवानंद स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी एसटीएन केबल नेटवर्कचे भूषण माने,दत्ता पाटील,दीपक कोरे,कृष्णात मगर,मोहन निलगार,रामदास जाधव,पवन कळंत्रे, प्रशांत भिऊगडे,यांसह लहान मुले, महिला,नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.