“नवरात्रोत्सव “जागर आदिशक्तीचा

नमस्कार मित्रानो
सर्वांना घटस्थापनेच्या व शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.आई अंबाबाई चा आशिर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहो हीच देवीच्या चरणी प्रार्थना.

महाराष्ट्र दऱ्या खोऱ्यांचा देश, महाराष्ट्र गडकोटांचा देश, ह्याच महाराष्ट्रात अनेक परंपरा संस्कृती जपण्याच महत्त्वाच काम केलं जातं.म्हणून महाराष्ट्र संस्कृती जपणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो.

आपल्या देशात संस्कृतीना- परंपरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सांस्कृतिक परंपरा मागे अनेक वैज्ञानिक कारणे दडलेली आहेत. अध्यात्मिक पद्धतीने केवळ सणाच्या रूपाने आपण ती साजरी करत असतो.”विज्ञानाने केली क्रांती पण अध्यात्मा शिवाय नाही मनःशांती”. सध्या सर्व भारतात नवरात्रीचा सण मोठ्या प्रमाणात व आनंदात साजरा करीत आहोत. आज घटस्थापना, घटस्थापनेच्या दिवशी दुर्गामातेचे आगमन होत असते. वर्षातील महत्त्वाच्या सणापैकी नवरात्री हा मोठा सण मानला जातो. कारण नवरात्रीमध्ये दुर्गा मातेचे पूजन केले जाते.नऊ दिवस दुर्गामातेची आराधना केली जाते. दुर्जनांचा संहार करणारी माता, दृष्टांचा संहार करणारी माता, म्हणून दुर्गा देवीची पूजा केली जाते. असत्याचा नाश होऊन सत्याचा विजय व्हावा सर्वांना चांगली बुद्धी लाभावी यासाठी नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे.

अमावस्ये नंतर “अश्विन” महिन्यातील पहिल्या दिवशी नवरात्री उत्सवाला सुरुवात होत असते. या नवरात्री उत्सवाचा घटस्थापना हा पहिला दिवस. घटस्थापनेच्या दिवशी दुर्गामातेचे आगमन होते. नवरात्र उत्सव नऊ दिवस चालणारा उत्सव आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. खेडेगावात गावातील मोठ्या मंदिरामध्ये गावातील सर्व लोक एकत्र येऊन, नऊ दिवस ग्रामदेवतेच्या ठिकाणी उपवास धरण्याची परंपरा आहे.नऊ दिवस याच मंदिरात सर्वजण उपवास करतात.

काहीजण नऊ दिवस केवळ फळे खाऊनच राहतात. काही ठिकाणी तर नऊ दिवस उभा राहूनच उपवास केला जातो.


नवरात्र उत्सवामध्ये अनेक जण अत्यंत कडक पद्धतीने उपवास करतात. काहीजण पायात चपला घालत नाहीत, काही जण नऊ दिवस मौन व्रत धारण करतात. यामध्ये एवढीच भावना असते की अनन्यभावे मातेची भक्ती करून देवीचा आशीर्वाद मिळवणे.

आज मोबाईल च्या जगात नवरात्र उत्सवाला विशाल स्वरूप प्राप्त झाले आहे. नवरात्र उत्सवा मध्ये विविध कार्यक्रमाचा अंतर्भाव झाल्याने प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो.काही ठिकाणी दांडिया खेळला जातो तर काही ठिकाणी गरबा खेळला जातो.


नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या परिधान केल्या जातात. या रंगाचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक रंगाचा वेगळा संदेश दिला जातो. नवरात्र हा उत्सव स्त्रीशक्तीचा जागर करणारा असून आदिमाया आदिशक्ती आई अंबाबाईच्या कृपेने सर्वांना सुखी ठेवावे यासाठी हा सण सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *