दिवाळी येणार अंगण सजणार,आनंद फुलणार घरोघरी…हाच उत्साह हाच आत्मविश्वास व आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करून दिवा रुपी प्रकाश उजळून टाकण्याचा संदेश देणारा सण म्हणजे दिवाळी.पहिला दिवस वसुबारस अर्थात गोपूजा.
दुसरा दिवस धनत्रयोदशी.अश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच दिवाळी पर्वातील अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. यंदा 2 धनत्रयोदशी तिथी आल्या असल्याने महाराष्ट्रात काही विशेष जिल्ह्यांनी 22 तर काही जिल्ह्यांमध्ये 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी करावी असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले आहे. उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी भगवान धन्वंतरीचे पुजन या दिवशी केले जाते. घरोघरी धनत्रयोदशी पुजन मोठ्या भक्तीभावाने केले जाते.
आपल्या भारतीय संस्कृतीत आरोग्याला अत्यंत महत्त्व दिलेले आहे. आरोग्यम् धनसंपदा आणि शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ही आपल्या संस्कृतीची ग्वाही आहे. त्यामुळे सणांचा राजा असलेल्या दीपोत्सवात धनत्रयोदशी या दिनविशेषाचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. धनत्रयोदशीला देवांचे वैद्य धन्वंतरी यांचे श्रद्धापूर्वक पूजन केले जाते. विष्णू पुराणात धन्वंतरी हा विष्णूचा अवतार असल्याचे म्हटले आहे, तर देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले, त्यावेळी जी चौदा रत्ने सागरातून बाहेर आली, त्यात धन्वंतरी यांचा
समावेश होता,असे पुराणात वर्णन आहे.
धन्वंतरी सागरातून अमृत कलश घेऊन आले. त्यांचा कमंडलू अमृताने भरलेला असतो. त्यांच्या कृपेने अनेक औषधी वनस्पती देवादिकांना प्राप्त झाल्या.अमृत मिळाले.धनु किंवा धन्व म्हणजे शल्य अर्थात शस्त्रक्रिया! शल्यशास्त्रातील सर्व ज्ञान असलेले ते धन्वंतरी. धन्वंतरी देवांची अशी ख्याती आहे. धन्वंतरी हे आयुर्वेदाचे संस्थापक मानले जातात. परिपूर्ण आरोग्याची संकल्पना देणारे धन्वंतरी हा आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमधील आदर्श आहेत.त्यांना प्रणाम.