कोरोना नंतरची निर्बंध मुक्त दिवाळी

lighted candles on flowers

सर्वत्र दिवाळीच्या सण आनंदाने साजरा होत आहे. सुखदुःखांना उजाळा देणारा सण म्हणजे दिवाळी, दुःख रुपी अंधार दूर करून सुखरूपी प्रकाश आयुष्यात फुलवून पुन्हा मार्गक्रमण करण्याचा संदेश देणारा गोड सण दिवाळी.. यंदाची दिवाळी तशी अधिकच गोड म्हणावी लागेल, कारण दोन वर्षाचा कोरोनाचा वनवास संपून पुन्हा एकदा थाटात मिरवत आलेली पहिली दिवाळी. उत्तम आरोग्य जपा संदेश देणारी दिवाळी. यंदाच्या दिवाळीची वैशिष्ट्येही तशीच खास आहेत.


कोरोनाचं थैमान
मार्च 2021 मध्ये कोरोना ला सुरुवात झाली. बघता बघता माणसं घरात कैद झाली. एरवी पैशासाठी पोटासाठी धावपळ करणारी माणसं, केवळ जगण्यासाठी संघर्ष करू लागली. पैशापेक्षा जीव महत्त्वाचा वाटू लागला. एक वेळचं पोटाला मिळालं तरी चालेल पण, जीव वाचला पाहिजे.”बचेंगे तो और लढेंगे” अशी परिस्थिती निर्माण झाली. यातच पहिली दिवाळी आली. सर्वत्र सामसूम, लॉकडाऊन ,निर्बंध यातच पहिली दिवाळी गेली.दुसरी दिवाळी तशीच. कोरोनाचे पुसट ढग दाटूनचं आली. आर्थिक चक्र बिघडलेल्या सर्वसामान्यांसह बड्या बड्या लोकांची आर्थिक घडी विस्कटली. पण “जिना है तो लढना होगा” अशा वृत्तीने पुन्हा एकदा सर्व अडचणी वर मात करत यंदाची दिवाळी, कोरोना नंतरची कोरोना मुक्त दिवाळी, कोणत्याही निर्बंधा विना साजरी होत आहे हे विशेष.


व्यापार
दिवाळीवर मंदीचे सावट अद्याप गेलेले नाही. बाजारपेठा सजलेल्या असल्या तरी, म्हणावं तशी खरेदी नाही. महागड्या वस्तू ब्रँडेड वस्तू म्हणणारे लोक पण लोकल वर आले. कारण अर्थकारण बिघडल्याने गरजेपुरतीच लोक खरेदी करताना दिसत आहेत.अनेकांच्या हातचा रोजगार गेल्याने, अनेक लोकांनी नोकऱ्या सोडून व्यवसायात पदार्पण केल्याने, व्यवसायातील स्पर्धा वाढली परिणामी नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे.


उद्योग
वाढती महागाई ,सुताचे वाढते भाव, कापडाची घटती मागणी, यामुळे वस्त्रोद्योगाला घरघर लागली आहे. एरवी 30-40 हजार बोनस घेणारे कामगार आता पंधरा-वीस हजार रुपये बोनस घेत आहेत. विज बिल, भाडे, मजुरी कमी,यामुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र धंदा टिकवण्यासाठी मालक वर्ग येणार दिवस पुढे ढकलून, “एक दिवस नक्की परिस्थिती सुधारेल” ही आशा बाळगून मार्गक्रमण करत आहे.


ऑनलाइन खरेदी
कोरोना काळात स्थानिक व्यापाऱ्यांनी सर्वांना आधार दिला. जगण्यास मदत केली. चार चार महिने मोफत अन्नदान काही समाजसेवी संस्थांनी दानशूर लोकांच्या पाठबळामुळे केले. मात्र कोरोना संपला अन केलेला उपकार फेडण्याऐवजी,लोकं 5-10 रुपयांच्या कमी किमतीमुळे ऑनलाईन खरेदी करू लागले. त्यामुळे स्थानिक किरकोळ व्यापाऱ्यांमध्येही अस्वस्थता आहे. कोरोना काळात दरवाजे बंद केलेल्या मॉलमध्ये खरेदी करण्याची आता फॅशनच आली आहे. त्यामुळे विचार करण्याची वेळ आलेली आहे. ज्यांनी आपल्याला संकट काळात जगवलं त्यांना मदत करायची की ; ज्यांनी कोरोनाच्या भीतीने आपले दरवाजे बंद केले त्या ऑनलाईन कंपन्या जगवायच्या?


वाढती महागाई
दिवाळी म्हटलं की फराळ,कपडे, वस्तूंची खरेदी हे ठरलेलं गणित. मात्र वाढत्या महागाईने लोक पुरते वैतागलेले आहेत. वाढती महागाई व तुरपुंजा पगार यामुळे संसाराचे बजेट मांडताना, अर्थसंकल्पा सारखी कसरत करावी लागत आहे. केवळ देव-देव म्हणून थोड्या प्रमाणात फराळ केला जात आहे.घरगुती वस्तूही गरजेनुसार घेतल्या जात आहेत.घरगुती फराळ कमी झाला असून तयार फराळ घेण्याला लोक अधिक पसंती देत आहेत.


आरोग्य
एरव्ही आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करणारे लोक, आता “आरोग्यम् धनसंपदा या ब्रिदाला जागत आहेत. एरव्ही इंजेक्शन, गोळ्या एवढेच वरच्यावर माहीत असलेल्या लोकांना, कोरोना नंतर ईसीजी, कोलेस्ट्रॉल,व्हेंटिलेटर याची सहजपणे माहिती झाली. कारण एचआरसीटी स्कॅन ते रेमडीसीविर ने साऱ्या जगाला आरोग्य विषयक जागरूकता आणली. त्यामुळे आरोग्य यंत्रणामध्ये अमुलाग्र बदल झाला ही जमेची बाजू. त्यामुळे कोरोना आला आणि आरोग्य जपण्याचा संदेश देऊन गेला हे मात्र नक्की.


माध्यमे
कोरोना नंतरच्या दिवाळीमध्ये जसे सर्व क्षेत्रात बदल झाले, तसेच माध्यमांमध्येही बदल झाले. वृत्तपत्रे आता ऑनलाईन झाली. त्यातून उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण झाले. सोशल मीडियावर लोक कनेक्ट झाले. युट्युब फेसबुकच्या माध्यमातून अनेक कलाकार उदयास आले. यातूनच त्यांना एक वेगळी दिशा मिळाली, पैसा मिळाला, ओळख मिळाली हे विशेष. त्यामुळे माध्यमांमध्ये कोरोना नंतर बरीच उलतापालथ झाल्याने यंदाची दिवाळी डिजिटल दिवाळी असा संदेश देत आहे.


शेती
जगाचा पोशिंदा ज्या मालकाला म्हटलं जातं, तो जगाचा मालक शेतकरी. कारण मातीत घाम गाळल्याशिवाय पीक येत नाही अन जगाच्या कोणत्याही मशीन मध्ये अन्नधान्य तयार होत नाही वास्तव आहे. कोरोना नंतर सर्व क्षेत्रात बदल झाला.तसेच शेती मध्ये देखील बदल होत आहे.अनेक शेतकरी आपला शेतीमाल बाहेर निर्यात करत आहेत. मात्र शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नसल्याने शेतकरी दिवसेंदिवस चिंतेत आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी मात्र सततच्या आस्मानी,सुलतानी संकटांनी तो खचला आहे.पण “मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवुनी नुसतं लढ म्हणा” ही वृत्ती तो आजही बाळगून आहे. पण आपण सर्वांनी या शेतकऱ्याला बळ दिलं पाहिजे. त्याच्या पाठीशी खंबीर उभं राहिलं पाहिजे. मायबाप सरकारनेही शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या पाहिजेत, कारण शेतकरी जगला तरच देश जगेल.


एकंदर सुखाची बरसात करत, अंधकाराचा नाश करत,जीवन उजळून टाकण्याचा संदेश देत दिवाळी आली. लाख संकटं आली तरी डगमगायच नाही,पुन्हा नव्या दमानं, नव्या जोशानं पेटून उठायचं आणि मार्गक्रमण करत राहायचं. हा प्रकृतीचा संदेश देत दिवाळी आली.. या मंगलमय पर्वाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *