ऑनलाईन 24 तास टीम
राज्यात नुकत्याच झालेल्या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आली असून,8 ऑक्टोबर पर्यंत त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या.
याआठवड्याभरात हरकतींचे संकलन करून,३१ ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा अंतिम करण्यात येऊन,नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना त्याआधारे आपले गुण कळू शकणार आहेत.
अंतिम गुणवत्ता 15 डिसेंबर पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात येणार आहे. २६ जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याचे नियोजन असल्याचेही समजते.साधारण फेब्रुवारीत उमेदवारांना नियुक्तीची ठिकाणे नेमून देण्यात येतील अशी माहिती तलाठी परीक्षेचे राज्य समन्वयक व अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांनी दिली आहे.
राज्यात ४ हजार ४६६ तलाठी पदांसाठी तब्बल 13 लाख अर्ज आले होते. यातील ८ लाख ५६ हजार जण परीक्षेला बसले होते.ही परीक्षा ५७ टप्प्यात घेण्यात आली.त्यानंतर प्रत्येक टप्प्यात घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आली आहे.त्यामुळे दिवाळीच्या आधी तलाठी होण्याचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांना प्रजासत्ताक दिनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
तलाठी परिक्षा टिसीएस कंपनीने घेतली होती. यानंतर जिल्हा परिषद भरतीची परीक्षा प्रक्रिया सुरू आहे.त्यामध्ये तलाठी पदासाठी अर्ज केलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.त्यामुळे या परीक्षेचा निकाल लागून प्रक्रिया झाल्यास विद्यार्थ्यांना कोणत्या पदासाठी प्राधान्य द्यावे हा पेच निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पद भरती प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी तलाठी भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी अशी विद्यार्थी वर्गातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.