इचलकरंजी/प्रतिनिधी
आमदार प्रकाश आवाडे व त्यांचे पुत्र माजी जिल्हापरिषद सदस्य डॉ राहुल आवाडेंच्या भाजप प्रवेशाने मतदार संघासह जिल्ह्यात खमंग चर्चा सुरू आहे.दरम्यान आवाडेंच्या पक्ष प्रवेशाने त्याना किंवा त्यांच्या पुत्राला पुन्हा आमदारकीची लॉटरी लागणार? की आवाडेंना थांबवण्यासाठी खेळलेली राजकीय खेळी आहे, हे थोड्याच दिवसात स्पष्ट होणार आहे.
चार दशकापासून आवाडे-हाळवणकर संघर्ष सर्वश्रुत आहे.यानंतर 2009 साली झालेल्या निवडणुकीत सुरेश हाळवणकर हे आवाडे यांच्या विरोधात निवडणूक लढवून विजयी झाले.यानंतर मतदार संघात भाजपची पेरणी करण्यात आमदार हाळवणकर यशस्वी झाले.यानंतर जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणुकीत उमेदवार निवडून आणले.यानंतर 2014 सालीही हाळवणकर निवडून आले.त्यामुळे हाळवणकर यांचे पक्षात वजन वाढले.
भाजप मध्ये हाळवणकरांचा दबदबा असल्याने आमदार आवाडे यांचा प्रवेश “तारीख पे तारीख” असाच सुरू होता.मात्र थेट केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्तेच आवाडे यांचा पक्ष प्रवेश घेतल्याने त्यांच्या प्रवेशाला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
त्यांच्या वरिष्ठ पातळीवरून झालेल्या प्रवेशामुळे,डॉ राहुल आवाडे यांना तिकीट दिल्यास स्थानिक कार्यकर्त्यांना पक्ष आदेश समजून त्यांचा प्रचार करावा लागणार आहे.राहुल आवाडे यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे.त्यामुळे इचलकरंजी मतदार संघात महायुतीला अच्छे दिन आले आहेत.
मूळचे भाजप कार्यकर्ते नाराज?
याउलट सुरेश हाळवणकर यांना मानणाऱ्या कट्टर कार्यकर्त्यांची या प्रवेशामुळे कोंडी झाली आहे. ज्यांच्या विरोधात लढलो त्यांचाच प्रचार करावा लागणार या कल्पनेनेच अनेकजण उघड उघड नाराजी व्यक्त करत आहेत.
हाळवणकरांची गुगली?
दरम्यान आवाडे यांचा केवळ पक्षात प्रवेश झाला असून उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून होत असल्याने हाळवणकरांनाही तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.जर तसे झाले तर आवाडेना पक्ष आदेश मानून त्यांचा प्रचार करावा लागणार ही देखील दुसरी बाजू आहे.
ताराराणी आघाडीचे काय?
आमदार आवाडे यांनी ताराराणी आघाडीतून अपक्ष निवडणूक लढवली होती.मात्र भाजप प्रणित महायुतीला पाठींबा दिला होता.यानंतर मागील महिन्यांत 5 जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले होते.ताराराणी आघाडीत असल्याने त्यांना भाजपचा अडथळा न्हवता.मात्र आता थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना ताराराणी आघाडीचे विसर्जन करावे लागणार आहे.त्याचबरोबर त्यांना उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करणे देखील अवघड आहे.त्यामुळे आवाडे यांचा प्रवेश त्यांच्या पथ्यावर पडतो की चक्रव्यूहात टाकतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे.