जयसिंगपूर-प्रतिनिधी
जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल कॉर्नर समोर 24 ऑगस्ट रोजी संतोष जावीर याचा अज्ञात इसमाने खून केला होता.या खूनाचा छडा लावण्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले असून, याप्रकरणी संशयित विशाल कांबळे(रा. तमदलगे,ता. शिरोळ)यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की 24 ऑगस्ट रोजी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, हॉटेल कॉर्नर समोर,संतोष रामदास जावीर (वय.35) यास अज्ञात इसमाने ठार मारल्याची घटना उघडकीस आली होती.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील,पोलीस उपअधीक्षक रोहिणी सोळंके, जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी भेट दिली होती.स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपासाची चक्रे गतिमान केली होती.सदर गुन्हा तात्काळ उघडकिस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सूचना दिल्या होत्या.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना,पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारानुसार,सदर गुन्हा विशाल कांबळे नामक युवकांने केला असल्याचे समजले.त्यानुसार विशाल कांबळे यास तमदलगे येथून ताब्यात घेण्यात आले.विशाल कांबळे यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता,प्रथम त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली.परंतु त्यास विश्वासात घेऊन सखोल तपास केल्यानंतर ,सुमारे दीड महिन्यापूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत
सदरची कामगिरी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे,पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे,संदीप जाधव, हरीश पाटील,प्रशांत कांबळे,सुरज चव्हाण,राजीव शिंदे,संभाजी भोसले, युवराज पाटील,महेश खोत,संजय इंगवले,तुकाराम पाटील,सचिन देसाई,सुशील पाटील,यशवंत कुंभार, प्रदीप पवार यांनी केली.