कोल्हापूर-प्रतिनिधी
येथील कोल्हापूर गगनबावडा रोडवरील बालिंगा येथील,कात्यायनी ज्वेलर्सवर भरदिवसा पिस्तुलातून गोळीबार करत दरोडा टाकणाऱ्या दोघा गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.संशयित विशाल धनाजी वरेकर (वय 32 राहणार कोपार्डे, ता. करवीर) व सतीश सखाराम पोहाळकर (वय 37 राहणार कनेरकर नगर रिंग रोड फुलेवाडी, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.

या दोघांच्या ताब्यातून सुमारे दोन दुचाकी, कार, सोन्याचे दागिने असा सुमारे 30 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.यामध्ये आणखी एका स्थानिक आरोपीसह चार परप्रांतीय आरोपींचा समावेश आहे. त्यांचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

बालिंग तालुका करवीर येथे सराफ व्यवसायिक रमेश शंकर माळी यांचे कात्यायनी ज्वेलर्स सराफ पेढी आहे. या ठिकाणी चोरट्यांनी पिस्तुलातून गोळीबार करीत गुरुवारी भर दिवसा सराफ पेढी लुटली होती. तसेच रमेश माळी व त्यांच्या मेहुण्याला गंभीर दुखापत करून पलायन केलं होते.त्यामुळे सराफ व्यवसायिकात खळबळ माजली होती.
या दरोड्यात अंदाजे 2:15 किलो वजनाचे सोन्याचे दागिने व दीड लाख रोकड असा सुमारे दोन कोटी सहा लाख 850 रुपयांचा ऐवज लंपास केला होता.या घटनेने सराफ व्यापारी व जनमानसात भीती पसरली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज द्वारे व तांत्रिकदृष्ट्या तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी विशाल वरेकर आणि सोनार सतीश पोहाळकर यांनी त्यांचे स्थानिक व परराज्यातील साथीदारांची मदत घेऊन सराफ पेढी लुटलेली आहे. त्यानुसार या दोन आरोपींच्या घरी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले.पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांना पोलीस खाकया दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.कळंबा कारागृहात असताना त्याची परराज्यातील आरोपींची ओळख झाली.त्यानंतर तीन ते पाच जूनच्या दरम्यान कात्यायनी ज्वेलर्स वर पाळत ठेवून त्यांनी दरोडा टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरोडा टाकल्यानतंर आरोपी येवलुज मार्गे कोपार्डे येथील घरी गेले. त्या ठिकाणी लूटीतील सोन्याच्या दागिन्यांची वाटणी करून परराज्यातील चार आरोपी कारने पुण्याच्या दिशेने पळून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज द्वारे समोर आले आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले.
