इचलकरंजी/शैलेंद्र चव्हाण
इचलकरंजी मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार यावरून घमासन चालू असतानाच,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवाडे यांच्याच बाजूने कौल दिल्याने आवाडे यांचे भाजपमधील स्थान बळकट झाले आहे.तर आवाडे म्हणतील तोच उमेदवार देण्याचे त्यांनी संकेत दिल्याने डॉ.राहुल आवाडे यांची उमेदवारी या निमित्ताने फायनल झाल्याचे चित्र आहे.
आमदार प्रकाश आवाडे यांनी काही दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांचे पुत्र डॉ. राहुल आवाडे यांच्यासह प्रवेश केला होता.त्यावेळेस इचलकरंजी मधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती.

यानंतर माजी आमदार हाळवणकर यांना आमदारकीचे तिकीट मिळणार नसल्याचे चित्र होते.मात्र काही राजकीय जाणकार,त्यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करणार असल्याचे सांगत होते.मात्र जाहीर केलेल्या आमदारांच्या यादीत त्यांचे नाव नसल्याने आमदार हाळवणकर यांना विधान परिषदेवरही डावलले गेले.
यानंतर गुरुवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे इचलकरंजीत आले.यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला,उमेदवारी बाबत चर्चा केली.यावेळी राहुल आवाडे यांच्याच उमेदवारीवर एकमत झाल्याने आवाडे यांनी केंद्रीय स्तरावर केलेली खेळी यशस्वी ठरली.त्यामुळे हाळवणकरांना पक्षासाठी आवाडे यांचा प्रचार करावा लागणार हे या निमित्ताने पक्के झाले आहे.

आमदार आवाडे यांचा लोकसंपर्क, डॉ.राहुल आवाडे यांनी विकास कामाच्या माध्यमातून घेतलेली गती, तसेच इचलकरंजी मध्ये भाजपला अस्तित्व टिकवण्यासाठी पक्षनिष्ठा म्हणून आवाडे यांचा प्रचार करावा लागणार आहे. त्यामुळे राहुल आवाडे यांची आतापासूनच विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे जाणकारातून बोलले जात आहे.
