इचलकरंजी/शैलेंद्र चव्हाण
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांत महायुती कडून डॉ.राहूल आवाडे यांना उमेदवारी दिल्यानंतर सुरेश हाळवणकर यांचा विरोध मावळला आहे.त्यांनीही राहूल आवाडे यांना निवडून आणण्याचा निर्धार केल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.तर त्यांच्या या पक्षनिष्ठेबद्दलची सर्वदूर चर्चा आहे.
दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते हिंदुराव शेळके यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे.त्यांचा महायुतीतील उमेदवाराला थेट विरोध असल्याने त्यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.तर जाणकारातून हिंदुराव शेळके भाजपच्या विरोधी भूमिका घेणार नसल्याचेही स्पष्टपणे सांगितले जात आहे.हाळवणकर यांच्या प्रमाणे त्यांची नाराजी लवकरच थंड करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप आणि पक्षनिष्ठा
भाजप आणि पक्षनिष्ठा हे समीकरण अगदी तंतोतंत पाळले जाते. भाजपमध्ये बंडखोरी करणाऱ्याला पक्षनिष्ठ भंग केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारला जातो. याची उदाहरणे बरीच आहेत.त्यामुळे इचलकरंजीतील भाजप विरोधी कारवाई करणाऱ्या भाजपवासीयांना पक्षाच्या शिस्तीपुढे आपला ठेका सुरू ठेवणे महागात पडणार असल्याचे चिन्ह आहे.
शिंदे गटाची भूमिका महायुतीला विरोध करणारी?
दरम्यान महायुती कडून राहुल आवाडे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे गटाचे खंदे समर्थक रवींद्र माने यांनी मी उमेदवार असल्याचा कित्ता अद्याप सुरूच ठेवला आहे.माने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असून ते शिंदे गटाचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.त्यामुळे मतदार संघात महायुती बद्दल वेगळा मेसेज जात आहे.त्यामुळे माने यांची भूमिका ही शिंदे गटाची भूमिका असणार आहे.
इचलकरंजीत शिंदे गटाची ही भूमिका असेल तर महायुतीला याचा फटका बसणार हे नक्की.या भूमिकेमुळे राज्यात इतर ठिकाणी शिंदेंच्या उमेदवारांना भाजपचे कार्यकर्ते विरोध करणार का? अशी चर्चा असून,लवकरच रवींद्र माने यांनाही पक्षाकडून थांबण्याचे फर्मान येईल असे सूत्रांकडून बोलले जात आहे.
