अखेर कबनूर मधील बहुचर्चित एम लिकर्स दारू दुकान सील,राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

कबनूर-प्रतिनिधी
येथील फॅक्टरी रोडवरील,तक्रारीमुळे नेहमी चर्चेत असणारे,नागरिकांचा विरोध असणारे एम लिकर्स हे देशी विदेशी दारूचे दुकान वाणिज्य परवाना नसल्याने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.यानंतर राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजीचे मुख्य निरीक्षक ए. एन. साळुंखे,दुय्यम निरीक्षक अंकिता पाटील,यांच्या पथकाने मंगळवारी 5 वाजता संबंधीत दुकान सील केले.सुमारे 6 वर्षे वाणिज्य परवाना नसताना,बेकायदेशीर रित्या सुरू असलेले दारू दुकान अचानक बंद झाल्याने याचीच चर्चा गावात होत आहे.

सदर दारू दुकान 2017 साली इचलकरंजी येथून कबनूर येथे स्थलांतर केले होते.हे दुकान नदीम मुजावर,भागीदार सुमित मेघानी यांचे नावे आहे.

तक्रार
सदर दुकान फॅक्टरी रोड वरील गट नंबर 1037 मध्ये ,म्हादगोंडा इरगोंडा पाटील,सचिन पाटील,उत्तम पाटील, यांच्या मालकीच्या जागेत आहे.त्यामुळे इरगोंड पाटील यांनी केलेला करार अपात्र ठरतो.दारू दुकानासाठी दिलेली जागा वाणिज्य नाही.ग्रामपंचायतीने म्हादगोंड पाटील यांची नोंदही रद्द केली आहे. त्यामुळे शासनाची सहा वर्षे कागदोपत्री फसवणूक करून चालू असलेले एम लिकर्स दुकानावर कारवाई करावी अशी मागणी अजित खुडे,सुरेश केटकाळे,यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार केली होती.

प्रथम तक्रार
सदर दारू दुकान गट नंबर 1028 मध्ये नसून 1037 मध्ये असल्याची तक्रारही झाली होती.यानंतर शासकीय फी भरून खुडे यांनी मोजणी आणली होती.त्यावेळी सदर दुकान 1037 मध्ये असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र तरीदेखील हे दुकान चालूच होते.

जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल
याबाबत अप्पर तहसिलदार यांचे पत्रानुसार, गट नंबर 1037 वर्ग 2 धर्मादाय इनाम असल्याने,सदर त्रुटी दूर होत नाहीत तोपर्यंत अनुज्ञप्तीचे सर्व व्यवहार बंद ठेवण्याचेआदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

आदेश स्वीकारताना अजित खुडे,निलेश पाटील,बाळू कामत

सामाजिक कार्यकर्त्यांचा लढा
सदर बेकायदेशीर दारू दुकान बंद व्हावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अजित खुडे,शांतीनाथ कामत,निलेश पाटील,सुरेश केटकाळे यांनी पाठपुरावा केला.अनेक अडचणींचा सामना करत हा लढा सुरू होता.मोजणीच्या वेळी ही बाचाबाची व शिवीगाळ झाली होती.त्यामुळे अजित खुडे यांनी पायाला भिंगरी बांधून दुकान बंद करण्याची प्रतिज्ञा केली होती.

पिशवी किंग अजित खुडे
गावातील एक शेतकरी कुटुंबातील, सामाजिक कार्यात आवड असणारे कार्यकर्ते म्हणून अजित खुडे ओळखले जातात.त्यांनी हातात पिशवी घेतली की तक्रार दाखल झाली हे समीकरण असते.त्यामुळे पिशवी किंग अजित खुडे सर्वांना परिचित आहेत.हे दारू दुकान बंद होऊ नये म्हणून अनेक जोडण्या लावण्यात आल्या.मात्र त्या टिकल्या नाहीत.त्यामुळे त्यांच्या या लढ्याला यश आल्याने त्यांचीच चर्चा सोशल मीडियावर आहे.

महिला वर्गातून समाधान
सदर दारू दुकान इंदिरा कॉलनी नजीक होते.याठिकणी लोकांची वर्दळ असायची.त्यामुळे महिला वर्गातून नाराजी व्यक्त होत होती.तसेच याच मार्गावर जवळच एक शाळा असल्याने पालक वर्गातही नाराजी होती.अखेर दुकान बंद झाल्याने भागातील नागरिकांत आनंद व्यक्त होत आहे.

ग्राहकांची गैरसोय
अचानक दारू दुकान बंद झाल्याने अनेक दारू खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची,ऐन पावसात गैरसोय झाली.रात्री उशिरापर्यंत अनेक जण दारू घेण्यासाठी येत होते.दुकान उघडण्याची वाट बघत होते.पण दुकान बंद असल्याने रिकाम्या हाताने निराश होऊन परत जात होते.

6 वर्षे प्रशासनाची डोळेझाक का?
सदर दारू दुकान बंद करावे अशी मागणी सर्वप्रथम सुरेश केटकाळे यांनी केली होती.यानंतर शांतीनाथ कामत यांनी,सदर दारू दुकानासाठी अवैध कागदपत्रे जोडली असून सदर बेकायदेशीर दुकान बंद करण्याची मागणी केली होती.मात्र प्रशासनाने सुमारे 6 वर्षे या बेकायदेशीर दुकानाला अभय दिल्याने याचा नेमका ‘अर्थ” काय असा सवाल उमटत आहे.

हायकोर्टात जाणार-निलेश पाटील
सदर दारू दुकानाला अभय देणाऱ्या सर्व बाबींचा विचार करून आपण हायकोर्टात जाणार असल्याचे उप सरपंच निलेश पाटील यांनी सांगितले.अशाप्रकारे कागदपत्रे अपूर्ण असताना 6 वर्षे दुकान चालू कसे राहिले? याला जबाबदार असणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.

Posted in All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *