सहकारातून समृध्दीकडे वाटचाल केलेल्या दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लि; गंगानगर (इचलकरंजी) या साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती ढासळली असताना,स्व. दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या निधनानंतर या कारखान्यास उर्जितावस्था आणण्याकरीता प्रयत्नशील असलेले या कारखान्याचे चेअरमन पिरगोंडा म्हादगोंडा तथा पी.एम. पाटील यांनी सहकार, सामाजिक आणि राजकीय यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असताना गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. तसेच पंचगंगा साखर कारखान्याबरोबरच कारखान्यातील सर्व कामगार आणि सभासद बंधूंना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याकरीता त्यांनी सुरु ठेवलेले कार्य खरोखरच आदर्शवत आहे.आपल्या कर्तबगारीच्या बळावरच ते या परिसरातील जाणते नेतृत्व बनले आहेत.

शिरोळ तालुक्याचे माजी आमदार दे.भ. स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांना आदर्श मानून सामाजिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे कबनूर येथील पी. एम. पाटील या नावाने परिचित असणारे एक जाणकार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. वडिल म्हादगोंडा पिरगोंडा पाटील यांनी चांगल्या पध्दतीने संस्कार केल्यामुळे आजही पी.एम. पाटील आई-वडिलांनी दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवरच जीवनाची वाटचाल करीत आहेत.घरच्या पारंपरिक शेती व्यवसायातही ते रमतात. पी.एम. पाटील यांचे प्रथमिक शिक्षण कुमार विद्या मंदिर कबनूर, माध्यमिक शिक्षण गोविंदराव हायस्कूल इचलकरंजी येथे झाले.

जन्म २४ सप्टेंबर १९५०
पी.एम. पाटील यांचा जन्म २४ सप्टेंबर १९५० रोजी कबनूर येथे झाला.सधन असणाऱ्या पाटील कुटूंबात त्यांच्यावर संस्कार आई सोनाबाई म्हादगोंडा पाटील, तसेच आई-वडिलांच्या बरोबरच चुलते आप्पासाहेब पिरगोंडा पाटील यांनी त्यांचा सांभाळ केला.घरची परिस्थिती सधन व चांगली असल्यामुळे त्यांच्या वाटचालीत कोणतीही अडचण आली नाही. कुस्ती हा त्यांचा आवडता खेळ, तर दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार हे त्यांचे आदर्श व्यक्तीमत्व आहेत.जुने चित्रपट पहायला त्यांना आवडते. पहाटे उठणे, व्यायामासाठी बाहेर जाणे, ९ वाजता अल्पोपहार करणे, त्यानंतर कारखान्याच्या कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी काम करणे, दुपारी विश्रांती सायं. ५ वा. पुन्हा कारखान्यावर जाऊन दैनंदिन कामाची माहिती घेणे,उरलेला वेळ नातवंडां बरोबर कुटूंबात रममाण होऊन जगणे तसेच दैनंदिन जीवनात दिक्षीत पॅटर्नचा काटेकोरपणे अंमलजावणी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
सामाजिक भान ते लोकप्रतिनिधी
लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे नेहमीच ते समाजाच्या मदतीला धावून जात असत. त्यांनी केलेल्या कामामुळे कबनूर ग्रामपंचायतीचे सरपंचपद कबनूर जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य, विकास सेवा सोसायट्यांचे चेअरमन, कोल्हापूर जिल्हा सूतगिरणीचे संचालक, वडगाव अर्बन बँक व पिपल्स बँकचे संचालक अशा विविध पदावर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. सध्या कबनूर एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. तर दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या मुशीत तयार झालेले पी.एम. पाटील हे आण्णांचे विश्वासू शिष्य म्हणून त्यांचा उल्लेख होत होता. आण्णांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेला दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्या चे संचालक व चेअरमन म्हणून काम करत असताना कारखान्याच्या प्रगतीसाठी जीव ओतून काम केले आहे.

खंबीर चेअरमन
दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली आदर्शवत असणाऱ्या दे.भ. रत्नाप्पाण्णा
कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती काही कारणास्तव ढासळत गेली. कारखाना चालवणेही मुश्किल होऊन गेले. स्व. आण्णांच्या निधनानंतर तर कारखान्याची परिस्थिती आणखीनच बिकट बनत गेली. पण, आपले गुरु दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी साखर कारखाना सुरू रहावा यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यांचा आदर्श घेऊन पी.एम. पाटील यांनी पंचगंगा साखर कारखाना चालवण्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन ती यशस्वीपणे पेलण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू ठेवला. कारखान्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी त्यांनी सुरु ठेवलेले प्रयत्न आजही आदर्शवत ठरत आहेत.

सभासदांचं हित
कारखान्याची प्रगती तर व्हावीच शिवाय कारखान्याचे कामगार व सभासदांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. यामुळे सध्या पंचगंगा साखर कारखाना चांगल्या पध्दतीने सुरु असून सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पी. एम. पाटील यांनी यासाठी घेतलेले परिश्रम कोणालाही नाकारता येणार नाहीत. कारखान्याचे चेअरमन आणि संचालक म्हणून त्यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी सुरु ठेवलेले प्रयत्न कारखान्याच्या भरभराटीसाठी फायद्याचे ठरत असल्याचे सभासदांच्यातून बोलले जात आहे.
सर्वांचे बाप्पा
सामाजिक, राजकीय आणि सहकार व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना पी.एम. पाटील यांनी आपल्या कुटूंबालाही तितकाच वेळ दिला आहे. मुले प्रमोद व आप्पासो यांनाही सामाजिक कार्याचे बाळकडू त्यांनी दिले आहेत. आप्पासो पाटील हे कबनूर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असणारी सोसायटी चांगल्या पध्दतीने चालवून आपल्या वडिलांच्या कार्याचा आदर्श आपल्या मनावर बिंबवल्याचे दाखवून देत आहेत. प्रमोद पाटील हे हातकणंगले पंचायत समितीचे माजी सदस्य व कबनूर देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. सद्या ते पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम पहात आहेत.त्यांनीही आपल्या वडिलांप्रमाणे समाजकारण व राजकारणात चांगले काम केले आहे.
देशभक्त रत्नाप्पाण्णांच्या विचारांनी वाटचाल
पी. एम. पाटील हे दे.भ. रत्नाप्पाण्णांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहेत. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध क्षेत्रातील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सहकार, सामाजिक कार्यातील अनेक पुरस्कार मिळालेले पी.एम. पाटील हे मिळालेल्या संधीचे सोने करून गोरगरीबांचे प्रश्न सोडविल्यामुळे मिळालेले समाधान यातच ते आनंद मानतात. विविध पदावर कार्यरत असताना गावविकासाला दिलेली चालना, कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांच्यासह गोरगरीब जनतेला केलेली मदत याचे त्यांना मानसिक समाधान आहे. त्यांच्या कार्यामुळे पी. एम. पाटील यांचा कर्तबगार नेतृत्व म्हणून नामोल्लेख होत आहे.त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा.
साहेब आप जिओ हजारो साल
साल के दिन हो पचास हजार.