कबनूर-प्रतिनिधी
कबनूर जलजीवन योजनेबाबत माहिती देण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत,जलजीवन समिती सदस्यांनी अध्यक्षा सौ शोभा पोवार,सचिव गणपत आदलिंग व जीवन प्राधिकरण अभियंता आर.व्ही.परीट यांना चांगलेच धारेवर धरले.योजनेचे काम अत्यंत ढिसाळपूर्वक सुरू असून जीवन प्राधिकरण मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत,जमत नसेल तर राजीनामा द्यावा अशी मागणी अशोक पाटील यांनी केली.
जलजीवन समितीचे केवळ 15 सदस्य
जलजीवन योजनेतील वाढीव पाईपलाईन तसेच इतर वाढीव प्रस्तावाबाबत चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायत सभागृहात बैठक बोलावली होती.समितीमध्ये 72 सदस्य असताना,अनेक महत्वाच्या गंभीर प्रश्नावर चर्चा होणार असताना केवळ 15 सदस्य उपस्थित होते.त्यामुळे ही समितीच बरखास्त करावी अशी मागणी झाली.त्यामुळे समिती मधील लोकांना किती गांभीर्य आहे याची चर्चा सुरू होती.
नेत्यांची नाव खाली का?
बैठकीसाठी काढलेल्या नोटीस मध्ये नेत्यांची नावे सगळ्यात शेवटी घातल्यावरून जोरदार नाराजी व्यक्त केली. जर तुम्हाला आमचं वावडं असेल तर आमचा सामूहिक राजीनामा घ्या,या मागचा नेमका सूत्रधार कोण याची माहिती सांगा अशी मागणी बी.डी.पाटील व जयकुमार कोले यांनी केली.

अभियंत्यांना अपूर्ण माहिती
जलजीवन योजनेविषयी तसेच राहिलेल्या त्रुटी,याबाबत माहिती देण्यासाठी जीवन प्राधिकरणचे अभियंता आर.व्ही.परीट आले होते. मात्र त्यांना व्हॉल्व किती आहेत,कनेक्शन किती आहेत याबाबत माहिती विचारली ,मात्र त्यांना याबाबत माहितीच नसल्याचे दिसून आले.यानंतर आपल्यालाच माहिती नाही तर आम्हाला कशाला बोलावले यावरून त्यांना धारेवर धरले.अखेर पुन्हा एकदा,तज्ञ व्यक्तीकडून सादरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदोष योजना राबवणाऱ्या जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांची बदली करावी,तसा या सभेत ठराव करावा अशी मागणी माजी पं.समिती सदस्य जयकुमार काडाप्पा यांनी केली.
योजनेच्या कामाला सुरुवात होऊन 2 महिने झाले,त्यानंतर आता गावात पाईपलाईन कोठे टाकणार याची चर्चा सुरू आहे.त्यामुळे जलजीवन समिती नामधारी असल्याचा सूर उपस्थित सदस्यांनी आळवला. याबाबत सरपंच शोभा पोवार यांना काहीच महिती नसल्याने आम्हाला कमिटीत का घेतले आहे असा उद्विग्न सवाल उपस्थित सदस्यांनी केला.
आमदार आवाडे यांना उदघाटनाला बोलावले नाही,आज बैठकीला बोलावले नाही असा प्रश्न ग्रा. पं. सदस्य सुधीर लिगाडे यांनी मांडला.यापुढील बैठक आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत होईल अन्यथा बैठक होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

एकंदर सुमारे 29 कोटीच्या योजनेविषयी ना सरपंच शोभा पोवार याना माहिती आहे ना इतर कोणाला. केवळ पंचगंगा संचालक प्रमोद पाटील यांना याबद्दल माहिती असल्याने त्यांच्याएवढी तरी माहिती जलजीवन समिती अध्यक्षांनी घ्यावी असा सूर निघाला.अखेर पुन्हा तज्ञ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे ठरले. त्यामुळे आजची 3 तास चाललेली बैठक निष्फळ ठरली.
यावेळी सरपंच शोभा पोवार,उप सरपंच सुनील काडाप्पा,जेष्ठ नेते जयकुमार कोले,बी.डी.पाटील,अशोक पाटील,बबन केटकाळे,दादा पाटील,ग्रा.पं.सदस्य प्रवीण जाधव,सैफ मुजावर,समीर जमादार,सुधीर लिगाडे,सुधीर पाटील,रजनी गुरव,वैशाली कदम आदी उपस्थित होते.