इचलकरंजी मधील जर्मनी गॅंगला “मोक्का”,गुन्हेगारी विश्वात खळबळ

इचलकरंजी-प्रतिनिधी
इचलकरंजी सह आसपासच्या ग्रामीण भागात गुन्हेगारी कृत्यांनी धुमाकूळ घालून दहशत माजवणाऱ्या,कुख्यात जर्मनी गॅंगला सहाव्यांदा “मोक्का” लावल्याने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.शहापूर पोलिसांच्या या दमदार कारवाईमुळे गुन्हेगारांची पाचावर धारण बसली आहे.सदरचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ यांच्याकडे सादर केला होता.त्यास मान्यता मिळाल्याने मोक्यावर शिक्कामोर्तब झाले.

यामध्ये जर्मनी गँग” या संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख आनंदा शेखर जाधव उर्फ जर्मनी, व त्याचे नेतृत्वाखालील टोळीचे सदस्य रुप्या उर्फ रुपेश पंडीत नरवाडे, मेहबुब इस्माईल उकली, सिद्धया उर्फ सिध्दु जटापा पुजारी,अरबाझ महमदहनिफ शेख, आशादुल्ला हारुण जमादार, महंमदकैफ आरीफ इनामदार, गौरव शरद मर्डे, रोहण प्रकाश मांडे,आदित्य राजेंद्र शेटके,राज उर्फ चिन्या संजय सुर्यवंशी, अक्षय अशोक घाडगे, रोहन सुरेश गेजगे, अक्षय अशोक कोंडुगळे, महेश आप्पासो माळी व विधी संघर्षित बालक यांचा समावेश आहे.

जर्मन टोळीचा यापूर्वी अनेक गुन्ह्यात सहभाग असून विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.सदर टोळीने रियल इस्टेट व्यावसायिक सरदार मुजावर यांचे अपहरण करून दहशत माजवली होती.शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी या प्रकरणाचा कसून तपास करून 15 जणांना जेरबंद केले होते.

तपासाची चक्रे गतिमान केल्याने पोलिसांना चकवा देऊन तपासावरून लक्ष हटवण्याच्या हेतूने संशयिता मधील दोघांनी कोठडीत विष प्राशन केले होते.यावेळीही पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न झाला;पण पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी तपासातील लक्ष विचलित न करता विष ठेवणाऱ्या टोळीचाही पर्दाफाश करून त्यांचा कुटील डाव हाणून पाडला व त्यांनाही जेरबंद केले.निरीक्षक सत्यवान हाके यांचा प्रामाणिकपणा व अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व उपअधीक्षक समिरसिंह साळवे यांच्या पाठबळाने आख्खी जर्मन गॅंग गुडघ्यावर आली.

दरम्यान वस्त्रनगरीतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी,व संघटीत टोळक्यांची गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी जर्मन गॅंगविरुद्ध “मोक्का”( महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा)अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव वरिष्ठांच्याकडे सादर केला होता.अखेर त्याला मंजुरी मिळाल्याने जर्मन गॅंगला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

मागील आठवड्यात लातूर येथील एका अपहाराच्या प्रकरणात, सत्यवान हाके यांनी तपास करून दाखल केलेल्या गुन्ह्यात,आरोपींना 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.त्यांनी तपास केलेल्या बहुतांश गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा लागली आहे. आता जर्मन टोळीवर “मोक्का” अंतर्गत कारवाई झाल्याने त्यांनी अशाच प्रकारे गुन्हेगारी मोडून काढावी व गुन्हेगारांच्यात पोलिसांचा वचक असाच ठेवावा अशी इच्छा सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *