इचलकरंजी-शैलेंद्र चव्हाण
येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्याला राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे म्हणून मंगळवारी घोषित करण्यात आले. ही घोषणा राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात आली.सदर माहिती मिळताच शहरवासीयांतून पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांचेसह कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.शिवाजीनगरसह राज्यातील एकूण पाच पोलिस ठाण्यांचा सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यामध्ये समावेश आहे.

पोलिस ठाण्यांमध्ये निकोप स्पर्धा वाढावी. तसेच कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध,दोषसिद्धी यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशपातळीवरून दहा सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची बेस्ट पोलिस स्टेशन म्हणून निवड करण्यात येते.त्यामध्ये महाराष्ट्र पोलिस दलातील पाच पोलिस ठाण्यांची सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे २०२१ म्हणून निवड करण्यात आली.
राज्यातील या 5 पोलीस ठाण्यांचा समावेश
शिवाजीनगर पोलिस ठाणे- इचलकरंजी,देगलूर पोलिस ठाणे -नांदेड, वाळूज पोलिस ठाणे-छत्रपती संभाजीनगर, अर्जुनी मोर पोलिस ठाणे गोंदिया, राबोडी पोलिस ठाणे-ठाणे शहर यांचा समावेश आहे.