जयसिंगपूर-प्रतिनिधी
जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा प्रवचन व पादुका दर्शन सोहळा मोठ्या भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी भाविकांनी गुरूपूजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

दसरा चौक झेले हायस्कूल ते स्टेशन रोड ते सिध्देश्वर मंदिर पर्यंत काढलेल्या शोभायात्रेने जयसिंगपूर वासियांचे लक्ष वेधून घेतले. जयसिंगपूर मधील सिध्देश्वर मंदिर जयसिंगपूर,तालुका शिरोळ येथे कोल्हापूर जिल्हा भक्त सेवा मंडळाच्या वतीने प्रवचन आणि पादुकादर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी झेले हायस्कूल ते सिध्देश्वर मंदिर स्थळापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली.यात्रेच्या अग्रभागी ढोल ताशा पथक होते. कलशधारी स्त्री, निशाणधारी पुरूष होते.रथामध्ये जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या.कलापथके आणि चित्ररथही सहभागी झाले होते. चित्ररथामध्ये छत्रपती शिवाजी महाराज,मावळे संताजी,धनाजी, बाजीप्रभू देशपांडे,राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशात भक्तगण सहभागी झाले होते.


या वैशिष्ट्येपूर्ण रॅलीने जयसिंगपूरकरांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रा दसरा चौक झेले हायस्कूल ते स्टेशन रोड पर्यंत सुरू झाली.तेथून सिध्देश्वर मंदिर पर्यंत शोभायात्रा आल्यानंतर आर्थिक दुर्बल,गरजू शेतकऱ्यांना १०१ इलेक्ट्रिक फवारणी पंपाचे मोफत वाटप लोकप्रतिनिधी,उद्योगपती याच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांचे प्रवचन झाले.त्यात त्यांनी डोळे विज्ञानवादी, मन आध्यात्मिवादी आणि बुद्धी वास्तववादी ठेवा.या त्रिसूत्रीने जीवनात सुख,शांती समाधान,स्थैर्य प्रगती साधता येईल.अंधश्रद्धा माणसाला अज्ञानाकडे घेवून जातात. ज्या व्यक्ती वरील त्रिसूत्राचा वापर आपल्या जीवनात करतात अशा व्यक्ती जीवनाच्या वाटेवर चालत असताना हताश होताना दिसणार नाहीत.सुखात हुरळून जाणार नाहीत वा दुःखात कोलमडून पडणार नाहीत.सुखदुःखात खंबीरपणे जगण्याची उमेद साधनेमुळे येते असे सांगितले. त्यानंतर गुरूपूजन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तमय वातावरणात पार पडला.त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.हा दर्शन आणि प्रवचन सोहळा यशस्वी होण्यासाठी कोल्हापूर जिल्हा भक्त सेवा मंडळाने परिश्रम घेतले.
