(online24taas team)
एसटी चा प्रवास करताना बस मध्ये चढताना,चोरट्यांनी महिलांचे दागिने चोरण्याचा जणू सपाटा लावला आहे.एसटीने महिलांना प्रवास भाड्यात50% सूट दिली असली तरी, गर्दीमुळे अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सूट नको पण चोरांना आवरा म्हणायची वेळ आली आहे.
गुरुवारी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात एस.टी.बस पकडत असताना महिलेची अडीच लाखांचे दागिने असणारी पर्स चोरट्याने लंपास केली.अशाच घटना अनेक बस स्थानकावर घडत आहेत.त्यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी गृह विभागाने विशेष पथक नेमावे अशी मागणी होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की संतोष गायकवाड हेआपल्या कुटुंबियांसह गुरूवारी दिनांक १८ रोजी मध्यवर्ती बस स्थानकात आले होते.एस.टी. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने महिलेची पर्स लंपास केली.यात सोन्याचे पाच तोळ्यांचे गंठण, एक तोळ्याचे झुबे,सोन्याचे वेल,असे सुमारे आठ तोळे सोन्याचे दागिने,रोख रक्कम,पॅनकार्ड, आधारकार्ड,ड्रायव्हिंग लायसेन्स असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
सध्या सुट्टीचे दिवस असल्याने अनेक प्रवाशी प्रवास करतात.त्यामुळे गर्दी वाढत आहे. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यानी डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी सर्वत्र सिसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून,चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
प्रवास करताना महिलांनी गर्दीमध्ये बसमध्ये चढताना खबरदारी घ्यावी.
प्रवास करताना सोन्याचे दागिने, पर्स,मोबाईल सांभाळून ठेवावा.
एकटीने प्रवास करताना दागिने परिधान करू नयेत.अशी घटना घडल्यानंतर लगेच पोलिसांशी संपर्क साधावा व तक्रार दाखल करावी.