कोल्हापूर- प्रतिनिधी
करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील, फुलेवाडी रिंग रोडवरील,अयोध्या कॉलनीमध्ये 6 जून रोजी,घरफोडी करून,बारा तोळे वजनाचे दागिने लंपास करणाऱ्या,संशयित रोहन रवींद्र चव्हाण (रा. फुलेवाडी ता.करवीर) याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या पथकाने मुसक्या आवळल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की,6 जून रोजी,फुलेवाडी रिंग रोडवरील,अयोध्या कॉलनीत राहणारे, विपुल चौगुले यांच्या घरामध्ये 12 तोळे सोने लंपास झाल्याची फिर्याद करवीर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.

तांत्रिक माहिती व मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्ती फुलेवाडी ते रंकाळा या रस्त्यावर दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.या अनुषंगाने त्या ठिकाणी सापळा रचून,रोहन रवींद्र चव्हाण यास ताब्यात घेतले असता, त्याच्या अंगझडतीत सुमारे 4 लाख 93 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने मिळून आले.तसेच त्याच्या कब्जातील स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण 5 लाख 43 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले.
संशयित आरोपीचे वधू वर सूचक केंद्र
आरोपी याचे वधू वर सूचक केंद्र असून,यातील फिर्यादी यांचे विवाह करिता,मुलगी शोधून देण्याकरता फिर्यादीच्या घरी येऊन गेला होता. फिर्यादी घरी नसताना चोरी केल्याची त्याने कबुली दिली.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे,पोलीस उपनिरीक्षक श्री शेष मोरे,पोलीस अंमलदार रणजित कांबळे,प्रितम मिठारी,प्रशांत कांबळे,सागर चौगले,संदीप गायकवाड, राजेंद्र वरंडेकर,सचिन बेंडखळे,विक्रम पाटील,सुप्रिया कात्रट यांच्या पथकाने केली.